आदर्श पालक बना आनंदाने जीवन जगा,आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५जबरदस्त टिप्स
आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५ जबरदस्त टिप्स....
भाग-२
नमस्कार,
आपण आदर्श पालक बनवण्याकरिता १५ जबरदस्त टिप्स पाहत आहोत. आपण भाग १ मध्ये खालील टिप्स पाहिल्या आहेत.
१.फळं बदलण्यासाठी मूळ बदला.
२.आपल्या मुलांचे प्रेरणास्त्रोत (role model)बना.
३.मुलांसाठी वेळ काढा.
४.भावनिक दृष्ट्या कनेक्ट होणे.
५.मुलांसमोर भांडण करू नये
वरील टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. भाग- १ ब्लॉग साठी तुमच्या छान प्रतिक्रिया मिळाल्या त्याकरिता मी तुमची खूप आभारी आहे. तर ,आज आपण आदर्श पालक बनण्याकरिता आणखी काही टिप्स पाहणार आहोत .त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग देखील शेवटपर्यंत नक्की वाचा.
नमस्कार ! मी भाग्यश्री फुले positive parent coach "मिशन positive parents" या प्लॅटफॉर्मची संस्थापिका,येत्या तीन वर्षात दहा हजार पालकांना आनंदी, सुदृढ आणि समतोल पाल्य घडविण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.
चला तर मग पुढील टिप्स पाहूयात.....
६. मुलांची तुलना करू नका-
प्रत्येक मुल हे वेगळे असते .ज्याप्रमाणे आपल्या हाताची पाचही बोटे सारखी नसतात. त्याप्रमाणेच प्रत्येक मुल हे देखील वेगवेगळे असते. त्यामुळे आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. बहुतांश पालक आपल्या मुलांची तुलना इतरांशी करत असतात.जर आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणाचे मुल अभ्यासात किंवा खेळात पुढे असते तेव्हा आपण त्याची तिथे तुलना करणे सुरू करतो आणि त्यामुळे मुलांचं मनोबल कमी होतं .उदाहरणार्थ- तो राहुल बघ त्याला 95 टक्के गुण मिळाले आहे आणि तुला फक्त 55 टक्के गुण तसेच तो सोनू बघ किती छान ॲक्टिव मुलगा आहे आणि तुला काहीच करायचं नसतं याप्रमाणे कळत-नकळत आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना केली जाते त्यामुळे मुलांचं मनोबल कमी होते आणि त्यांच्या मध्ये क्रोध आणि घृणा निर्माण होते त्यांची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्यांच्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होते आणि ते नवीन गोष्टी शिकू शकत नाहीत त्यांना हरण्याची भीती वाटते .पालकांनो, तुम्हीच विचार करा जर मुलांनी तुमची तुलना इतर आई-वडिलांशी केली तर.... म्हणून मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार कार्य करू द्या. त्यांना प्रोत्साहन द्या त्यांची तुलना करू नका.
७. जीवनात यशस्वी होण्यासाठी मुलांना नेहमी प्रोत्साहन द्या-
बरेच पालक अगदी लहानपनी मुलांना म्हणत असतात लवकर झोप नाहीतर पोलीस येतील ,मस्ती करशील तर बाथरूम मध्ये बंद करील, अभ्यास केला नाही तर टीव्ही पाहणे बंद ,भांडण केलं तर खेळणे बंद .बहुतांश पालकांना हेच वाटत असते की, त्यामुळे मुले आज्ञाधारक बनतील पण बहुतांश वेळा यामुळे त्यांच्या मनात एक काल्पनिक भीती निर्माण करतो आणि त्यांच्या मनात निराशा दुःख रोवतो त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते .शंभर पैकी 95 वेळा पालक हे त्यांना रागावून घाबरवून त्यांच्याकडून काम करून घेतात अभ्यास करून घेतात आणि फक्त पाच वेळा प्रेरणा देऊन काम करून घेत असतात. इथे मी तुम्हाला थॉमस एडिसन यांची एक गोष्ट सांगते, थॉमस एडिसन हे जे आज महान वैज्ञानिक म्हणून ओळखले जातात. ते जेव्हा लहान होते तेव्हा एक दिवस शाळेतून ते घरी परत आले आणि त्यांनी आपल्या आईला एक पत्र दिले आणि म्हणाले की, बाईंनी हा कागद तुझ्यासाठी दिला आहे ! त्यांच्या आईने ते पत्र वाचले तिच्या डोळ्यात पाणी आले. त्याला ती म्हणाली या पत्रात असे लिहिले आहे की, तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि ही शाळा त्याच्यासाठी खूप लहान आहे आणि आमचे शिक्षक त्याला शिकवण्यात कमी पडत आहे .तेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास घरीच घ्या बरीच वर्षे निघून गेली .आता एडिसन खूप मोठा शास्त्रज्ञ झाला होता त्याची आई मरण पावली होती. असंच एकदा घर साफ करत असताना ते बाईंनी दिलेले पत्र त्यांच्या हाती लागले. तेव्हा त्यांनी ते वाचलं त्यात लिहिलं होतं तुमचा मुलगा मानसिक रुग्ण आहे आम्ही त्याला शाळेत ठेऊ शकत नाही. तेव्हा ते वाचून एडिसनला धक्का बसला त्याच्या डोळ्यातून पाणी आलं त्याने आपल्या डायरीत लिहिले थॉमस एडिसन हा एक मानसिक रुग्ण होता परंतु त्याच्या आईचा आत्मविश्वास प्रेम आणि प्रोत्साहनामुळे त्याच आयुष्य बदलू शकले.यावरून आपल्या लक्ष्यात आलेच असेल की, मुलांना प्रोत्साहन देणे किती आवश्यक आहे.
८. आपल्या मुलाचे मित्र बना-
आपल्या लहान मुलांची मानसिक क्षमता ओळखा त्यांचे मित्र बना मुलांच्या भविष्याची काळजी करताना थोडे त्यांच्या वर्तमानावर लक्ष देणे फार गरजेचे आहे . लहान मुलांच्या अनेक भावना असतात त्या जर ,पालकांनी योग्य पद्धतीने योग्य वेळी हाताळले नाही तर, त्या पुढे त्या त्रासदायक ठरू शकतात. मुले ही जेव्हा आपल्या भावना कल्पना सांगू शकत नाहीत व्यक्त होऊ शकत नाहीत तेव्हा त्यांचा मनातल्या मनात कोंडमारा होत असतो. त्यामुळे मुले मानसिक दृष्ट्या कमजोर होतात. प्रत्येक जन्माला आलेल्या मुल काहीतरी वेगळेपण घेऊन येत असतं . एकाच प्रसंगात वेगवेगळ्या प्रतिक्रिया मुलांकडून येत असतात. तरीही आपण त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा पालक म्हणून त्यांना कौशल्य निपून होण्यास मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे आनंदी आयुष्य ते जगू शकतील. दररोज त्यांच्याशी गप्पा मारणे पालक म्हणून आपल्या अनुभवांची मुलांना योग्य शब्दात जाणीव करून देणे .त्यांच्या मनातल्या अप्रिय भावभावनांना दुर्लक्ष करू नये ,त्यांना कमी लेखू नये ,त्यांचे मित्र बना त्याचबरोबर आपण एक पालक आहोत याची देखील आपल्याला जाणीव असणे गरजेचे आहे.
९. मुलांना चांगल्या सवयींची शिकवण द्या-
प्रत्येक व्यक्ती आपल्या सवयींच्या आसपास आपले जीवन जगत असतो .तुम्ही कसे बसता? कसे चालता? कसे बोलता ?कसे विचार करता ?या सर्व गोष्टी आपल्या सवयींवर निर्भर आहेत जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सर्व व्यक्ती आपल्या सवयीनुसार आपले व्यवहार करीत असतो .व्यक्तीच्या व्यवहारामुळे त्याचे चरित्र निर्माण होत असते. आपल्या सवयी आपल्या जीवनावर प्रभावित करीत असतात म्हणून आपल्या सवयी उपयोगी असतील की,अडथळा याचा विचार होणे गरजेचे आहे. पुष्कळदा निगेटिव्ह थिंकींग, आळस ,व्यसन ,वेळेचा अपव्यय यासारख्या सवयी लागलेले लोक त्या ते सोडू शकत नाही आणि त्याच सवयी मुलांना देखील नकळतपणे लागतात आणि त्याच त्यांचे भविष्य घडविण्यास कारणीभूत ठरतात.
जर आपल्याला चांगलं झाड लावायच आहे तर खूप मेहनत घ्यावी लागेल परंतु गवत हे आपोआपच उगवत असते. त्याचप्रमाणे मुलांच जीवन देखील असते .आपण मुलांना ज्या प्रकारच्या सवयी ,शिकवण देऊ तसेच त्यांचे चारित्र्य निर्माण होणार आहे .त्यामुळे त्यांचे चारित्र्य निर्माण हे त्यांना चांगल्या सवयी च्या आधारावर करूया. वैज्ञानिक दृष्टीने कोणतीही गोष्ट ही निरंतर 21 दिवस केली तर ती सवय बनते .याचा अर्थ जशा सवयी निर्माण होतात तशा त्या सोडवू पण शकतो .म्हणूनच एक पालक म्हणून आपण जेवढे लक्ष शिक्षणावर देतो तेवढेच लक्ष त्यांच्या सवयींवर शिकवणी वर देखील द्यायला हवं .उदाहरणात- मुलांना व्यायाम, प्राणायाम किंवा पुस्तक वाचनाची सवय लावणे त्याचबरोबर शाळेतून आल्यानंतर आपल्या वस्तू जागेवर ठेवणे, रात्री लवकर झोपणे,लवकर उठणे यासारख्या सवयी आपण जर फॉलो करत असू तर नक्कीच मुलांना देखील त्या चांगल्या सवयी आपोआप लागतील.
१०. पालक( आई-वडील )यांच्यामध्ये दुमत नसावे-
ही एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आई-वडिलांमध्ये मुलांशी संबंधित एखाद्या गोष्टीवर दुमत नसावे. उत्तर हे हो किंवा नाही हे सारखेच असावे कारण,जर मुलांना असे वाटले की ,आई ही नेहमी हो म्हणेल आणि बाबा हे नेहमी नाही म्हणणार तेव्हा ते कोणतेही काम एकाकडून हुशारीने करून घेणार किंवा एकालाच जास्त महत्व देणार उदा. जर मुलाला बाहेर खेळायला जायचे आहे त्यावर आई हो म्हणत आहे आणि बाबा नाही म्हणत आहेत कारण, ते जर घरी नसतील त्यांना माहीत नसतं त्याने आपला अभ्यास पूर्ण केला आहे किंवा नाही अशावेळी आई -वडिलांनी चर्चा करून उत्तर द्यावे .अशाप्रकारे कोणतीही समस्या किंवा कोणतेही मुलांशी संबंधित निर्णय घेताना ते पालकांनी मिळून घेणे योग्य ठरते.
'तुमच्या मुलांसाठी तुम्ही सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहात'.
या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मुलांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतो. आपण थोडे प्रयत्न केले तर नक्कीच आपल्या मुलांना आपण चांगल वातावरण देऊ शकतो आणि मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो.आदर्श पालक बनू शकतो.
अजूनही काही टिप्स आपण पुढील ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला?हे मला कमेंट द्वारे नक्की कळवा.इतरांना share करा जेणेकरून त्यानाही माहिती मिळेल.काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारू शकता आणि अशाच महत्वाच्या टिप्स पाहिजे असतील तर,माझा फेसबुक ग्रुप (मिशन positive parent's)जॉइन करू शकता.
ग्रुप जॉईन करण्याकरिता मिशन positive parents इथे क्लिक करा.
हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏
माझा या अगोदर चा ब्लॉग भाग-१ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
फेसबूक ग्रुप लिंक -






Khup chan point
ReplyDeleteThank you
DeleteFantastic mam ..Keep it up
ReplyDelete